महायुती सरकारने एक वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी......!

Fri 5th Dec 2025 04:46 pm
काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई, दि.५(अनंत नलावडे)- महायुती सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष आज पूर्ण झाले.या एक वर्षात सरकार आपलीच पाठ थोपटून घेत आहेत, पंचतारांकित हॉटेल मध्ये बसून सरकार आपली उपलब्धी सांगत असले तरी जनतेच्या पदरी मात्र निराशाच आली आहे, त्यामुळे या सरकारने अधिवेशनात आपल्या कामाची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी येथे केली.


महायुती सरकार आल्यानंतर शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही.बियाणे खत मिळत नाही. मराठवाड्यात पूर आला यातून शेतकरी उध्वस्त झाला आहे. कुपोषित बालकांची संख्या वाढली.राज्यातील रस्त्यांची चाळण झाली आहे.महिलांवर अत्याचार वाढले आहे. बिल्डर आणि मंत्री संगनमताने राज्यातील कोट्यवधीच्या जमिनी बळकावल्या जात आहे.लाडक्या उद्योगपतींना लाभ मिळतो,पण सामान्य जनतेला मात्र संघर्ष करावा लागत आहे.म्हणून या सरकारने एक वर्षात केलेल्या कामाची श्वेतपत्रिका काढावी अशी थेट मागणीच वडेट्टीवार यांनी केली.


चंद्रपूर येथील बरांज कोळसा खाणीत पूर्णतःहा नियमांचे उल्लंघन करून अवैध कोळशाचे उत्तखंनन करण्यात येत आहे.हा लाखोंचा कोळसा खुल्या बाजारात विकला जात आहे. पर्यावरण विभागाने या खाणीला २०२३ ला मंजुरी देताना ज्या अटी व शर्ती घातल्या होत्या,त्यांचा भंग केला जात असून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अजूनही करण्यात आलेले नाही.पर्यावरण मंत्र्यांपासून ते वन अधिकारीही यात सहभागी आहेत.याविरोधात विधानसभेत आम्ही प्रश्न उपस्थित करणार असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला.

 

महायुती सरकार सत्तेत आले पण विधानसभा असो की विधानपरिषद या सभागृहात विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही.कारण हे सरकार लोकशाही आणि संविधानाला मानत नाही.लोकशाहीत विरोधी पक्ष महत्वाचा असतो.पण सरकारला विरोधक नको,विरोध नको म्हणून ही पद रिक्त ठेवण्यात आल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली.नागपूर इथे हिवाळी अधिवेशनपेक्षा अर्थसंकल्पीय अधिवेशन घेतले पाहिजे,अशीही मागणी यावेळी वडेट्टीवार यांनी केली.