उंब्रज मध्ये कावीळचा प्रादुर्भाव ; उपाययोजना न झाल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकणार

Fri 29th May 2026 12:38 pm
रिपब्लिकन पक्षाचे ग्रामपंचायतीला निवेदन, तातडीच्या उपाययोजनांची मागणी

उंब्रज प्रतिनिधी :


 कराड तालुक्यातील उंब्रज गावात कावीळ रोगाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेचा विषय ठरत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या वतीने ग्रामपंचायत उंब्रज गावचे प्रशासक ग्रामसेवक यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, गावात मोठ्या प्रमाणावर कावीळचे रुग्ण आढळून येत असून ग्रामपंचायतीकडून रोग नियंत्रणासाठी प्रभावी पावले उचलली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. विशेषतः गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्यांची स्वच्छता नसल्याने दूषित पाण्यामुळे आजाराचा फैलाव होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


गावातील पाणी साठवण टाक्यांमध्ये मासे मृत पावलेले (घाण व कचरा) आढळून येत असून तेच पाणी नागरिकांच्या वापरासाठी पुरवले जात असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय भूमिकेमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ग्रामपंचायतीला पुढील उपाययोजना तात्काळ राबविण्याची मागणी करण्यात आली आहे –
गावात आरोग्य शिबिर आयोजित करून संशयित रुग्णांची तपासणी करावी.
पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची तातडीने स्वच्छता करावी.
संपूर्ण गावात औषध फवारणी मोहीम राबवावी.
नागरिकांना आरोग्यविषयक दक्षतेबाबत जनजागृती करावी.
पाणी निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक उपाययोजना त्वरित कराव्यात.


या मागण्या तत्काळ पूर्ण न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे कराड उत्तर तालुका युवक अध्यक्ष अभिषेक उत्तमराव कांबळे यांनी दिला आहे.यावेळी अनिकेत येवले,अक्षय कांबळे,निखिल बैले,अनिकेत कांबळे,सुजल कांबळे,दादा कांबळे,प्रशांत बैले,अतिष बैले,नितीन कांबळे,राजेंद्र कांबळे,शुभम बैले हे उपस्थित होते


गावातील वाढत्या कावीळ प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालून प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.




पाणी साठवण टाकीत मृत मासे आढळून आले आहे याबाबत सकृत दर्शनी पुरावा उपलब्ध असून पाणी पिण्या योग्य आहे का याची तपासणी सरकारी दवाखान्याने नियमित करणे गरजेचे असताना सरकारी दवाखाना जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असून याबाबत संबंधित यंत्रणेला योग्य ती समज देण्यात यावी तसेच तात्काळ प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात अन्यथा ग्रामपंचायत उंब्रजला आम्ही टाळे ठोकणार आहे.
अभिषेक उत्तमराव कांबळे
इंडिया (आठवले) चे कराड उत्तर तालुका युवक अध्यक्ष