उंब्रज / प्रतिनिधी
अमेरिकेत भीषण अपघातानंतर मृत्यूशी झुंज देणाऱ्या वडगाव (उंब्रज) येथील नीलम तानाजी शिंदे (वय ३५) हिने चार महिन्यांच्या अथक उपचारानंतर डोळे उघडत सर्वांना आशेचा किरण दिला होता… मात्र नियतीने हा आनंद फार काळ टिकू दिला नाही. तब्बल १४ महिन्यांच्या संघर्षानंतर नीलमची जीवनयात्रा संपली असून तिच्या निधनाने संपूर्ण परिसर हळहळला आहे.
■ चार महिन्यांनी उघडले डोळे… प्रार्थनांना मिळाले उत्तर
फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या नीलमचा सायकलवरून प्रवास करत असताना भीषण अपघात झाला होता. बेदरकार चारचाकी वाहनाने धडक दिल्याने तिच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन ती कोमात गेली.
अमेरिकेतील रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तिच्यावर उपचार सुरू होते. तब्बल चार महिन्यांच्या प्रयत्नानंतर नीलमने डोळे उघडले होते. तिच्या पापण्यांची हालचाल, श्वासोच्छ्वासातील बदल यामुळे डॉक्टरांनाही सकारात्मक संकेत मिळाले. त्या क्षणी उपस्थित असलेल्या वडील तानाजी शिंदे यांना अश्रू अनावर झाले होते.
■ वडिलांच्या हाकेला मिळाला प्रतिसाद
१०-१२ दिवसांच्या प्रयत्नानंतर इमर्जन्सी व्हिसा मिळवून तानाजी शिंदे ३ मार्च रोजी अमेरिकेत पोहोचले. सॅक्रामेंटो येथे पोहोचताच त्यांनी थेट रुग्णालय गाठले.
कोमात असलेल्या लेकीला त्यांनी हाक मारताच नीलमने पापण्यांची हालचाल केली… तिचा श्वास वेगाने वाढला… हा क्षण उपस्थित डॉक्टर आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांसाठीही भावनिक ठरला. यानंतर रुग्णालयाने युद्धपातळीवर उपचार सुरू ठेवले.
■ उपचारांना प्रतिसाद… पण लांबचा प्रवास बाकी
एमआरआय तपासणीत नीलमच्या मेंदूमधील काही पेशींमध्ये सुधारणा दिसून आली होती. तिला दररोज १० ते १५ मिनिटे खुर्चीवर बसवले जात होते. हात-पायांवरील फ्रॅक्चरही नियंत्रणात आले होते.
तथापि, मेंदूवरील दाब पूर्णपणे कमी होण्यासाठी दीर्घकालीन उपचारांची गरज असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. नीलम पूर्णपणे बरी होऊन भारतात परत येईल, अशी आशा कुटुंबीयांना वाटू लागली होती.
■ समाज, माध्यमे आणि प्रशासनाचा पाठिंबा
नीलमच्या अपघाताची बातमी माध्यमांत झळकल्यानंतर देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. सामाजिक, राजकीय स्तरावर प्रयत्न होऊन तिच्या वडिलांना अमेरिकेचा व्हिसा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली गेली. अनेकांनी प्रार्थना केल्या… आणि काही काळासाठी त्या सार्थकीही लागल्या.
■ पुन्हा प्रकृती खालावली… अखेरचा श्वास
मात्र, पुढील काळात नीलमची प्रकृती पुन्हा खालावली. दीर्घकाळ कोमात राहिल्याने आणि मेंदू पूर्णपणे कार्यरत न झाल्याने उपचारांना अपेक्षित यश मिळू शकले नाही. अखेर १४ महिन्यांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर तिचा मृत्यू झाला.
अवयवदानातून दिला जीवनाचा संदेश
नीलमने जिवंतपणी अवयवदानाचा निर्णय घेतला होता. कुटुंबीयांनी तिची शेवटची इच्छा पूर्ण करत तिचे अवयवदान केले. तिच्या जाण्याचे दुःख असले तरी तिच्या निर्णयामुळे अनेकांना नवजीवन मिळणार आहे.
■ वडिलांची भावनिक प्रतिक्रिया
“नीलमने डोळे उघडल्यावर आम्हाला आशेचा किरण दिसला होता… ती बरी होऊन भारतात येईल असे वाटत होते. पण देवाची इच्छा वेगळी होती,” अशी भावना वडील तानाजी शिंदे यांनी व्यक्त केली.
नीलम शिंदेची कहाणी ही आशा, संघर्ष आणि शेवटी मानवतेचा संदेश देणारी ठरली आहे. काही काळासाठी मृत्यूवर मात करणाऱ्या या मुलीने अखेर जीवनाची लढाई हरली… पण तिच्या अवयवदानामुळे ती अनेकांच्या रूपाने जिवंत राहणार आहे.