नगरपालिकेच्या उदासीनतेने पर्यटनस्थळाला गाठीला घातले संकट — नागरिकांमध्ये संतापाची लाट
पूर्वी शहरातील कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जात होती. मात्र, यंदा सुरुवातीपासूनच नगरपालिका प्रशासनाने या कामाचा ठेका मे. व्ही. डी. के. या खाजगी कंपनीला जवळपास दुप्पट रकमेने दिला. या ‘अवाजवी ठेक्या’चा नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर आणि नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून ठेका रद्द करण्याची मागणीही झाली; पण काही काळानंतर विरोध मावळला आणि या वादाच्या आडील कारणे आजही गूढच आहेत.
शहरातील नागरिकांकडून सक्तीने कचरा वर्गीकरण करून घेतले जाते, परंतु डम्पिंग ग्राउंडवर मात्र सर्वच कचरा वर्गीकरणाशिवाय एका ठिकाणी टाकला जातो. पोकलॅंड मशिनच्या सहाय्याने हे ढिगारे ‘डोंगर’ बनवले जात आहेत. यासाठी महिन्याकाठी लाखो रुपये खर्च होतात, आणि त्यावरून पालिकेची तिजोरी रिकामी होत आहे.
वर्षाकाठी जवळपास चार कोटी रुपये खर्च करूनही कचरा व्यवस्थापनाची स्थिती जसंच्या तशी आहे. या गैरव्यवस्थेमुळे जलप्रदूषण, दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वन्यजीवांवरही या दूषित वातावरणाचा परिणाम होत असल्याचे स्थानिक पर्यावरणतज्ज्ञ सांगतात.
संबंधित ठेकेदार शहरातील सार्वजनिक शौचालयांची देखभालही करत नाही. पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना दुर्गंधी, घाणीचा त्रास सहन करावा लागत आहे. स्वच्छ भारत मोहिमेचे फलक सर्वत्र दिसतात, पण प्रत्यक्षात ‘स्वच्छतेचा’ बोजवारा उडाला आहे.
माहिती अधिकारातून ठेक्याची माहिती मागवली असता प्रशासनाने ती जाणीवपूर्वक लपविल्याचा आरोप आहे. यामध्ये नक्की कोणाचे हित साधले जात आहे, हा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. काहींनी या ठेक्यामागे “आर्थिक साखळी आणि राजकीय आशीर्वाद” असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
महाबळेश्वर हे निसर्गाच्या सान्निध्यातील शांत पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. पण या कचऱ्याच्या डोंगरांमुळे येथील पर्यावरण, आरोग्य आणि पर्यटन उद्योग यांवर गंभीर संकट ओढवले आहे “आज जर उपाययोजना केली नाही, तर उद्या महाबळेश्वर ‘हिल स्टेशन’ नव्हे तर ‘कचरा स्टेशन’ म्हणून ओळखले जाईल,”असे नागरिक संतप्तपणे म्हणतात.
महाबळेश्वरकरांनी, पर्यावरण प्रेमींनी आणि स्थानिक संस्थांनी या प्रश्नावर आवाज उठवणे आता अत्यावश्यक झाले आहे. कारण —
“कचऱ्याचे डोंगर आज उभे राहिले आहेत; उद्या तेच आपल्या आरोग्याच्या आणि निसर्गाच्या विनाशाचे प्रतीक ठरतील!”