एसटीचा तोटा कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा.....!

Thu 16th Apr 2026 09:26 am
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे सक्त निर्देश

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा.....!


परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे सक्त निर्देश 


मुंबई, दि.१५(अनंत नलावडे)- २०२५-२६ या आर्थिक एस टी महामंडळाच्या आर्थिक कामगिरीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करतानाच परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट कठोर भूमिका मांडत तोटा कमी करण्यासाठी सर्वंकष उपाययोजना राबविण्याचे निर्देश महामंडळाच्या अधिकाऱ्यांना महामंडळाच्या मुख्यालयात बुधवारी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत बोलताना दिले.या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर हेही उपस्थित होते.


या आर्थिक वर्षात एसटीचे एकूण उत्पन्न ११,४७५ कोटी रुपये इतके नोंदविण्यात आले, तर खर्च १२,०६६ कोटी रुपये झाला. त्यामुळे महामंडळाला तब्बल ५९१ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. अशात दैनंदिन सरासरी उत्पन्न ३१ कोटी ४० लाख रुपये असताना, खर्च मात्र ३३ कोटी रुपये इतका झाला असून दररोज सुमारे १ कोटी ६० लाख रुपयांचा तोटा होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणत त्यांनी यासंदर्भात उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत, "या पुढे तोटा सहन करणार नाही.... त्यासाठी खर्चात थोडी काटकसर करा"... अशी तंबीही सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिली.


राज्यातील एकूण ३१ विभागांपैकी केवळ ८ विभाग नफ्यात असून, उर्वरित २३ विभाग तोट्यात असल्याची बाब निदर्शनास आली असता त्यांनी यावर गंभीर चिंता व्यक्त करताना त्यांनी तोट्यातील विभागांची सखोल चौकशी करून त्यामागील कारणे शोधून काढून त्यावर ठोस उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले. तसेच आता सातत्याने तोट्यात असलेल्या मोठ्या विभागांमध्ये सक्षम आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगत त्यांनी उपस्थित काही अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर अप्रत्यक्षपणे कारवाईचे संकेत देत,"येत्या आर्थिक वर्षात वाहतुकीचे सुयोग्य नियोजन करून उपलब्ध बसेस आणि मनुष्यबळाचा अधिकाधिक कार्यक्षम वापर करणे अत्यावश्यक असून उर्वरित दीड ते दोन कोटी रुपयांचा दैनंदिन तोटा भरून काढणे हे आपले मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे,” असेही त्यांनी अधिकाऱ्यांना निक्षून बजावले.


त्याचप्रमाणे सातत्याने तोट्यात असलेल्या मोठ्या विभागांमध्ये सक्षम आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगत नागपूर सारख्या मोठ्या विभागात “ज्या अधिकाऱ्यांकडे आर्थिक आणि वैधानिक अधिकार नाहीत, ते प्रशासनावर प्रभावी नियंत्रण ठेवू शकत नाहीत.त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना पर्यायी पदस्थापना देऊन सक्षम नेतृत्व देणे आवश्यक असल्याचेही ठाम मत त्यांनी व्यक्त केले.


एकंदरीतच काय तर आगामी काळात एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशासनिक शिस्त, संसाधनांचा प्रभावी वापर आणि जबाबदारी निश्चिती या तत्त्वांवर भर देत लवकरच व्यापक सुधारणा आराखडा राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेतही मंत्री सरनाईक यांनी दिले.