रेल्वे अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित
मसूर - प्रतिनीधी
कराड तालुक्यातील शिरवडे रेल्वे स्टेशन नजीकच्या रेल्वे रूळाखालील बोगदा तांत्रिकदृष्टया चुकीचा आहे. या त्रुटी विरोधात नडशी, शिरवडे, उत्तर कोपर्डे ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रियेत आज जोरदार आंदोलन पुकारले.
नवीन बोगदयासाठीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठीचा लागणारा कालावधी जास्त आहे.आपल्या निवेदनाप्रमाणे इस्टिमेट करून वरिष्ठांकडे पाठविले आहे. तांत्रिक मान्यता मिळाले नंतर कामास मंजुरी मिळेल. ११ सप्टेंबर पर्यंत पदाधिकारी व प्रमुखांची मीटिंग घेऊन हा प्रश्न निकाली काढण्यात येईल
राकेश शर्मा
सहाय्यक विभागीय अभियंता सातारा.
रेल्वे स्टेशनवर झालेल्या आंदोलनस्थळी जुना बोगदा बंद करा..... नवीन बोगदा झालाच पाहिजे.... अशा घोषणा रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यासमोर दिल्या. त्यातच रेल्वेचे अधिकारी वेळेत न आल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन घेतल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
नवीन पुलाची मंजुरीसाठी पुण्याचे रेल्वे अधिकारी विकास कुमार यांना संपर्क साधला, मेसेज पाठवला. तरीही त्यांचे उत्तर नाही. आम्हाला नाईलाजास्तव आंदोलन करणे भाग पडत आहे. जो कालावधी दिला आहे. त्या कालावधीत काम सुरू न झाल्यास तीव्र रेल रोको आंदोलन करणार. आम्ही पाकिस्तान, रशियातून आल्यासारखी वागणूक देऊ नका. आम्हालाही रेल रोको पासून कुणी रोखू शकत नाही.
निवासराव थोरात
अध्यक्ष कराड उत्तर काँग्रेस कमिटी.
तत्पूर्वी आज सकाळी १० वा.पासून सुरू झालेल्या आंदोलनस्थळी लेखी आश्वासन दिल्याशिवाय जागा सोडणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. त्याचबरोबर जोपर्यंत नवीन ब्रिजला मान्यता मिळत नाही तोपर्यंत परिसरातील काम बंद ठेवण्याचा निर्धारही व्यक्त केला.
कराड उत्तर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निवासराव थोरात, नडशीचे सरपंच गोविंदराव थोरात, माजी उपसरपंच भगवान थोरात, डॉ.अनिल घाडगे, .नडशीच्या पोलीस पाटील वैशाली गायकवाड, मंगेश पाटील, युवक काँग्रेसचे प्रशांत यादव कवठेकर, कोणेगावचे सरपंच रमेश चव्हाण, भगवान थोरात, राजेंद्र थोरात यांच्यासह ग्रामस्थ, महिलां उपस्थित होत्या. रेल्वे पोलीस निरीक्षक सत्तवीर सिंह, एस्. एन्. रेड्डी, तळबीडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक किरण भोसले यांनी चोख बंदोबस्त ठेवला.