गृहकर्ज नोंदीसाठी ७ हजारांची लाच घेताना भूमापक रंगेहात अडकला
कराड / प्रतिनिधी
गृहकर्जाचा बोजा मालमत्ता पत्रिकेत नोंद करण्यासाठी थेट लाचेची मागणी करणाऱ्या कराड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराचा आणखी एक चेहरा उघड करणारी ही कारवाई कराड शहरात खळबळ उडवणारी ठरली आहे.
भूमी अभिलेख कार्यालयात परिरक्षण भूमापक (वर्ग–३) म्हणून कार्यरत असलेला कुंडलिक खंडू मोडक (वय ३८) याला तक्रारदाराकडून ७,००० रुपये लाच स्वीकारताना आज दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (पुणे विभाग) यांच्या पथकाने केली.
१० हजारांची मागणी, ७ हजारांत ‘तडजोड’
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या गृहकर्जाचा बोजा मालमत्ता पत्रिकेत नोंद करण्यासाठी आरोपी मोडक याने सुरुवातीला १०,००० रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तक्रारीच्या अनुषंगाने ३ फेब्रुवारी रोजी मागणी पडताळणी करण्यात आली असता, आरोपीने ‘तडजोडीअंती’ ७,००० रुपये लाच निश्चित केली.
कार्यालयातच सापळा; पंचासमक्ष स्वीकार
आज कराड येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातच सापळा रचण्यात आला. पंचासमक्ष तक्रारदाराकडून ७,००० रुपये स्वीकारताच आरोपी मोडकला रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर करण्यात आलेल्या अंगझडती, वाहन व कार्यालयीन झडतीत ७,००० रुपये रोख रक्कम आणि ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन (अंदाजे किंमत १०,००० रुपये) जप्त करण्यात आला आहे.
घरझडती सुरू; भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा
आरोपीच्या कराड व पुणे येथील निवासस्थानी झडती घेण्यासाठी स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली असून ही प्रक्रिया सुरू आहे. कुंडलिक खंडू मोडक याच्याविरोधात कराड शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
संपूर्ण कारवाईत कोण सहभागी?
या सापळा कारवाईत सापळा अधिकारी राजेंद्र सानप (पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. कोल्हापूर) यांच्यासह ASI प्रकाश भंडारे, HC संदीप काशिद, PN सचिन पाटील, PC उदय पाटील, चा.पो.ह. गजानन कुराडे यांनी सहभाग घेतला. तर संपूर्ण कारवाईवर वैष्णवी पाटील (पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर) यांनी पर्यवेक्षण केले.
ही कारवाई म्हणजे सामान्य नागरिकांच्या कामासाठी लाच मागणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना दिलेला थेट इशाराच असून, “लाच देऊ नका, तक्रार करा” हा संदेश पुन्हा एकदा ठळकपणे समोर आला आहे.