भाजपा महायुती सरकारकडून "डुबता महाराष्ट्र" करण्याचे पाप......!

Thu 16th Apr 2026 09:31 am
हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

भाजपा महायुती सरकारकडून "डुबता महाराष्ट्र" करण्याचे पाप......!


हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल 


मुंबई, दि.१५(अनंत नलावडे)- राज्यातील

तरुणपिढीला बरबाद करणारे ड्रग्जचे विष आता मुंबई-पुणे सारख्या मोठ्या शहरातच नाही तर तालुक्यापर्यंत पोहोचलेले आहे.गुजरातच्या कांडला बंदराच्या ड्रग्ज कॉरिडॉरमधून हे विष आपल्या राज्यात येत असल्याचा अप्रत्यक्ष भाजपवर निशाणा साधत राजकीय आशिर्वादामुळेच "उडता पंजाब" प्रमाणे ‘डुबता महाराष्ट्र’ बनवण्याचे पाप महायुतीने केल्याने तरुणाईला बरबाद करणाऱ्या महायुती सरकारला जनता कदापी माफ करणार नाही, असा थेट इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना दिला.

 

सपकाळ यांनी भाजपा महायुती सरकारवर तोफ डागताना पुढे म्हणाले की, तुळजापूरची आई तुळजाभवानी हे आपले श्रद्धास्थान असून या पवित्र तिर्थक्षेत्राला मोठा अध्यात्मिक व ऐतिहासिक वारसा व परंपरा आहे. परंतु याच शहराचा नगराध्यक्ष ड्रग्ज रॅकेटमधला आरोपी असून त्याला भाजपा उमेदवारी देऊन नगराध्यक्ष बनवते, यातून काय संदेश जातो....? दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातेवाईकाच्या शेतात ड्रग्जचा कारखाना सुरु असतो, त्यात खासदार श्रीकांत शिंदेंच्या हस्तक्षेपाने पकडलेले आरोपी सोडून देण्यात आले व प्रकरण दडपण्यात आले. म्हणून ड्रग्ज सारख्या अत्यंत गंभीर प्रकरणाला जर अशा प्रकारे राजकीय अभय मिळत असेल तर तरुण पिढीला नशेखोरीत लोटण्यास मदतच होणार आहे. वास्तविक पाहता ड्रग्ज प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.


मुंबईतील नेस्को मध्ये पोलिस स्टेशनच्या समोरच ड्रग्ज व दारु पार्टी होते हे कशाचे द्योतक आहे...? हे पोलीस प्रशासन, गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे अपयश असून फडणवीस यांच्या काळातच राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. ड्रग्जचा राजरोस धंदा जोरात सुरु असताना अशोक खरात, नाशिकमध्ये आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, अमरावती मध्येही शेकडो मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघड होत आहेत.नाशिकच्या प्रकरणात तरं जबरदस्तीने धर्मांतराचा मुद्दा चर्चिला जात आहे. त्यामुळे याप्रकरणी एफआयआर सार्वजनिक करण्याची गरज असून सर्व प्रकरणात कठोर कारवाई केली पाहिजे.मात्र राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत बिकट बनल्याने देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊन राज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री द्यावा, अशी मागणीही सपकाळ यांनी केली.