कराड उत्तर मतदार संघातून किवळ चे भिकूनाना किवळकर यांचे नातू प्रदीप साळुंखे यांनी व वासुदेव माने यांनी शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढविली आहे. याचाही उल्लेख बैठकीत करण्यात आला.
मसूर : प्रतिनिधी
कराड उत्तर मतदार संघ हा परंपरेने शिवसेनेचा आहे त्यामुळे येथे आयात उमेदवार न देता कट्टर शिवसेनेचाच उमेदवार द्यावा कारण कराड उत्तर मतदार संघातून मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी निवडून यावा अशी भावना येथील कार्यकर्त्यांसह कराड उत्तरमधील तमाम जनतेची व लाडक्या बहिणींची आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार यांनी केले. मसूर भागातील शिवसेना कार्यकर्त्यांची आढावा बैठक मसूर येथे पार पडली. त्यावेळी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप साळुंखे, कराड उत्तर तालुकाप्रमुख राजेंद्र नलवडे, लाडकी बहीण योजना तालुकाध्यक्ष राहुल ढाणे, किवळ चे सामाजिक कार्यकर्ते वैभव साळुंखे, ऋषिकेश पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेलार पुढे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे आपल्या सातारा जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे आपणाला सातारा जिल्हा बांधायचा आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी ' नायक ' चित्रपटाला साजेसे काम करताना अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री तसेच मुख्यमंत्री सन्मान योजना दिली. शेतीपंपाचे बिल माफ केले. गोरगरीब कष्टकऱ्यांना अनेक लाभ दिले. लाडकी बहीण योजना आणली. जे कोणी लाभांपासून वंचित आहेत तिथपर्यंत आमचे कार्यकर्ते पोहचून अडचणी दूर करून त्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. वासुदेव माने म्हणाले, हे मायबापाची सावली देणारे सरकार आहे. बापासारखी माया लावणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री शंभूराज देसाई आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा कुठलाही विकास कामाचा कागद बाजूला पडू देत नाहीत. कारण कराड उत्तर हा शिवसेनेचाच बालेकिल्ला असून येथील उमेदवारी शिवसेनेलाच मिळावी असाही सूर त्यांनी आळवला. प्रदीपराव साळुंखे म्हणाले, शिवसेनेचे विचार व कल्याणकारी योजना आम्ही घरोघरी पोहोचवल्या आहेत. मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका होत असून मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यातून सर्वच आमदार निवडून द्यायचे असा चंग आम्ही सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी तसेच लाभधारक शेतकऱ्यांनी व तमाम लाडक्या बहिणींनी बांधला असून कराड उत्तर हा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळाला पाहिजे. कराड उत्तरचा अट्टाहास इतर कुणी धरू नये असेही त्यांनी ठणकावले.
राहुल ढाणे म्हणाले, गत अडीच वर्षातील धाडसी निर्णय व योजना पाहता सर्वाधिक स्वागत झाले ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे. यामुळे शेतकऱ्यांच्या व माता-भगिनींच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला आहे. ते पुढे म्हणाले, पूर्वी शेकडो विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्या पण शिंदेशाहीत एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्यानंतर लगेचच संवेदनशील मनाच्या मुख्यमंत्री महोदयांनी मुलींना उच्च पदस्थ शिक्षण घेता यावे म्हणून सगळ्याच विभागातील फी माफ करून टाकली. आता कराड उत्तरच्या निष्क्रियतेचा कलंक पुसून टाकण्यासाठी परिवर्तन अटळ असून कार्यकर्त्यांना कराड उत्तरेत आयात उमेदवार नको आहे, तर मुख्यमंत्र्यांचा हक्काचा उमेदवार हवा असून शंभर टक्के निवडून आणण्यासाठी सेना सज्ज झाली आहे असे सांगून विरोधकांवर टीकास्त्र सोडताना ते म्हणाले, या मतदारसंघात केवळ तीन लाख, पाच लाख, सात लाख रुपये निधी टाकून अनेक जण विकास कामांच्या टिंबड्या वाजवत फिरत आहेत अशा संधीसाधू नेत्यांपासून सावध राहावे. येत्या निवडणुकीत जनमत आणि मुख्यमंत्री महोदयांची प्रतिमा हाच मुद्दा निर्णायक ठरणार आहे.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड झालेल्या विभागातील कार्यकर्त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सुहास जाधव, नवनाथ गायकवाड, ऋषिकेश साळुंखे, अक्षय माने आदींची उपस्थिती होती. स्वागत प्रदीपराव साळुंखे, पवन निकम यांनी केले. प्रास्ताविक राहुल ढाणे यांनी केले. तर सुरेश साळुंखे यांनी आभार मानले.