उंब्रज/प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रुक्मिणीबाई पांडुरंग कदम कन्या विद्यालय, उंब्रज येथील विद्यार्थिनींनी योगा क्रीडा प्रकारात घवघवीत यश संपादन करून विद्यालयाचा मान उंचावला आहे.
जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय शालेय योगा स्पर्धा नुकतीच कराड येथील टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात संपन्न झाली. या स्पर्धेत विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली.
14 वर्ष वयोगटात इयत्ता आठवी (तुकडी अ) ची कुमारी काव्या अनिल धुमाळ हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिची निवड आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. काव्याने यापूर्वीही माजगाव प्राथमिक शाळेत शिकत असताना राज्यस्तरीय पातळीवर योगा स्पर्धेत यश मिळवले होते.
17 वर्ष वयोगटात इयत्ता नववीच्या कुमारी अंजली भाऊसाहेब पवार हिने चौथा क्रमांक, तर कुमारी सृष्टी जयवंत पाटील हिने पाचवा क्रमांक मिळवून यशाची परंपरा कायम ठेवली. तसेच इयत्ता आठवीची कुमारी राजवर्धिनी रविराज पाटील हिने उत्साहाने सहभाग नोंदवला.
या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात कलाशिक्षक श्री. सुशिलकुमार कुंभार यांच्या प्रस्तावनेने झाली. त्यांनी “इन्साफ की डगर पर” हे प्रेरणादायी गीत सादर करून वातावरण भारावून टाकले.
मुख्याध्यापिका सौ. एस.आर. पाटील यांनी काव्या धुमाळ हिचा विशेष सत्कार करून तिच्या प्रयत्नांचे कौतुक केले. यावेळी उपशिक्षक श्री. अजय भरत मदने यांनी काव्याच्या प्रवासाची माहिती देताना सांगितले की, तिचा फॉर्म भरताना अनेक अडचणी आल्या होत्या, मात्र योग्य वेळी कारवाई करून जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याशी संपर्क साधून ती अडचण दूर करण्यात आली. या योगदानाबद्दल श्री. मदने यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच सौ. जाधव एस.बी., सौ. शिंदे के.एल., मिरजगावे के.एम. यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या यशामुळे विद्यालयात आनंदाचे वातावरण असून, आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेतही विद्यार्थिनी उत्तम कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.