आ.गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पाटण पंढरपूर राज्य मार्ग रोखला
उंब्रज/प्रतिनिधी
उंब्रज ता.कराड येथे पाटण पंढरपूर राज्य मार्गावर पाटण तिकटने येथे चरेगाव,उंब्रज सह परिसरातील राष्ट्रवादी शरद पवार गट व जयंत पाटील यांना मानणारे कार्यकर्ते याच्या वतीने उंब्रज पोलीस ठाण्याचे सपोनि रवींद्र भोरे यांना आ.गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत कारवाईचे निवेदन देण्यात आले. ही मागणी सहयाद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेशराव नानासाहेब माने यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र भिरे यांना लेखी निवेदनाद्वारे केली.
माने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
आ. गोपीचंद पडळकर यांनी अलीकडेच ज्येष्ठ नेते आ. जयंत पाटील यांच्याविरोधात केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह, अवमानकारक असून समाजात संभ्रम निर्माण करणारे आहे. जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रगल्भ व अनुभवी नेते असून त्यांनी गृहमंत्री,जलसंपदा मंत्री यासह विविध जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. त्यांच्यावर आक्षेपार्ह भाष्य करून पडळकर यांनी समाजातील शांतता व कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे निवेदनात नमूद आहे.
माने यांनी पुढे म्हटले आहे की,“पडळकर यांनी केलेले वक्तव्य हे केवळ जयंत पाटीलच नव्हे तर संपूर्ण राष्ट्रवादी शरद पवार गट व समर्थक नेत्यांचा अवमान आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगल्भ राजकीय परंपरा असलेल्या राज्यात अशा प्रकारची वक्तव्ये खपवून घेता येणार नाहीत. त्यामुळे तत्काळ त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी.”
या मागणीमुळे कराड तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. जयंत पाटील यांचे समर्थक संतप्त झाले असून पोलिसांकडून काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुरेशराव नानासाहेब माने यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात लेखी निवेदन देत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पडळकर यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ.जयंत पाटील यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला जयंत पाटील यांचे आजोळ असणाऱ्या चरेगाव परिसरातून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला आहे.