पाल–उंब्रज–मसूर–कोपर्डे गटाची रणधुमाळी : कराड उत्तरचा राजकीय इतिहास बदलणार?

Tue 3rd Feb 2026 12:20 am

अनिल कदम / उंब्रज


सुमारे नऊ वर्षांनंतर होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी कराड उत्तरच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवली आहे. या निवडणुका केवळ जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा स्थानिक सत्तेपुरत्या मर्यादित न राहता थेट आगामी विधानसभा राजकारणाची नांदी ठरत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. पाल, उंब्रज, मसूर आणि कोपर्डे या चारही गटांतील लढतींनी संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष वेधून घेतले आहे.


राजकीय वर्तुळात नेहमी सांगितले जाते की स्थानिक निवडणुका म्हणजे तळागाळातील कार्यकर्त्याला पुढे येण्याची संधी. मात्र सध्याच्या निवडणुकांत चित्र वेगळेच दिसत आहे. अनेक ठिकाणी पक्षनिष्ठा, कामाचा अनुभव किंवा जनाधार बाजूला ठेवून “मर्जीतील उमेदवार असावा” असा हट्ट धरला जात असल्याची चर्चा आहे. यामुळे वर्षानुवर्षे झटणारा कार्यकर्ता केवळ प्रचारापुरता मर्यादित राहतोय, तर संधी नाकारली गेल्याने तो बंडखोरीचा मार्ग स्वीकारत असल्याचे वास्तव समोर आले आहे.


याच पार्श्वभूमीवर पाल, उंब्रज, मसूर आणि कोपर्डे या गटांमध्ये अपक्ष तसेच विरोधात उमेदवारांची संख्या वाढताना दिसते आहे. काही ठिकाणी पक्षांतर्गत नाराजी इतकी टोकाला गेली आहे की माजी आमदार आणि आजी आमदार गटांनाही “कुणाला थांबवायचे आणि कुणाला पुढे करायचे” याचा मोठा काथ्याकूट करावा लागला होता. बेरजेच्या राजकारणात काही माजी नेते मागे पडत असल्याचीही कुजबुज आहे.


सोशल मीडियावर मोठे फॉलोअर्स, भव्य पोस्टरबाजी आणि चमकदार प्रचार यावर विसंबून असलेली अनेक नेतेमंडळी प्रत्यक्ष मतदारांपासून तुटलेली दिसतात. गल्लीबोळातील प्रश्न, स्थानिक नाराजी आणि अंतर्गत गटबाजी याचा योग्य अंदाज न आल्याने काही उमेदवार दिवास्वप्नातच अडकून पडल्याची चर्चा मतदारांत ऐकू येते.


या साऱ्या घडामोडींचा थेट परिणाम २०२९ च्या विधानसभा निवडणुकीवर होणार असल्याचा अंदाज राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत. चोरे येथील मनोमिलन, कोपर्डेतील फाटाफूट, मसूरमधील सावळागोंधळ आणि उंब्रजमधील सुप्त लाट—या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम कराड उत्तरच्या आमदारकीचा फैसला ठरवू शकतो. आगामी जनगणनेनंतर मतदारसंघ रचना बदलल्यास राजकीय गणिते आणखी गुंतागुंतीची होणार आहेत.


दरम्यान, खा. नितीन पाटील यांनी मागील काही वर्षांत झालेल्या राजकीय नुकसानाचा आढावा घेत नव्याने रणनीती आखल्याची चर्चा आहे. कै. अजित दादांच्या माघारी जिल्ह्यावर पुन्हा पकड मिळवण्यासाठी प्रसंगी एक पाऊल मागे टाकून मोठी बेरजेची खेळी करण्याची तयारी सुरू असल्याचे बोलले जाते.


एकूणच पाल–उंब्रज–मसूर–कोपर्डे गटातील ही निवडणूक केवळ स्थानिक सत्तेची नाही, तर कराड उत्तरच्या भविष्यातील राजकीय दिशाच ठरवणारी ठरणार आहे. युवकांची आक्रमक भूमिका, कार्यकर्त्यांची नाराजी आणि नेत्यांची समीकरणे—यातूनच पुढील राजकीय इतिहास घडणार, हे मात्र निश्चित.


२०२९चा आमदार इथूनच ठरणार ?


चोरेतील मनोमिलन, कोपर्डेतील फाटाफूट, मसूरचा सावळागोंधळ आणि उंब्रजमधील सुप्त लाट—या साऱ्यांचा एकत्रित परिणाम २०२९ मध्ये कराड उत्तरचा आमदार कोण? या प्रश्नाला थेट उत्तर देणारा ठरणार, असा अंदाज राजकीय निरीक्षक व्यक्त करतात.आगामी जनगणनेनंतर मतदारसंघ रचना सातारा ते काशीळ आणि पेरले ते कराड अशी पूर्ववत झाल्यास चित्र काय बदलेल, यावर चर्चांना उधाण आहे. विशेषतः शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शेंद्रे ते काशीळ या पट्ट्यात दिलेले लक्ष नेमकं काय सूचित करतंय—हा प्रश्न राजकीय वर्तुळात बोलका ठरतोय.