कराड उत्तरेत ६५.३३ टक्के सरासरी मतदान

Tue 7th May 2024 08:17 pm
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याच चुरशीचा प्रचार झाला. मतदान केंद्रापासून काही अंतरावर दोन्ही उमेदवारांचे समर्थक मतदान प्रक्रिया पुर्ण होई पर्यंत तळ ठोकून होते.
  • कराड उत्तरेत ६५.३३ टक्के सरासरी मतदान


- उंब्रज परिसरात शांततेत मतदान 


उंब्रज/प्रतिनिधी


     राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात ४५ सातारा लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. कराड उत्तरेत सरासरी ६५.३३ टक्के मतदान झाल्याची माहिती कराड उत्तर निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विजय पवार यांनी दिली. तसेच बाबरमाची येथे उशीरा मतदारांची गर्दी झाल्याने उशीरापर्यंत मतदान सुरू होते. 


    कराड उत्तर विभागातील मतदान केंद्रांवर सकाळपासून शांततेत मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळी ९.०० वाजेपर्यंत बहुंताश मतदान केंद्रांवर तुरळक मतदार दिसत होते मात्र त्यानंतर हळूहळू गर्दी वाढू लागली. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या उंब्रज येथे मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. उंब्रज येथे ग्रामपंचायत कार्यालयाशेजारील अंगणवाडी, कन्या विद्यालय, महात्मा गांधी विद्यालय, बस स्थानकापासून जवळ असलेली जिल्हा परिषद शाळा अशा चार ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात आली होती. त्यामुळे मतदारांची पायपीट थांबली. सर्वच मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात ठेवण्यात आला आहे.कडक उन्हाळा असल्याने निवडणूक आयोगाने सावलीसाठी छत व आरोग्य विभागाच्या वतीने प्रत्येक केंद्रांवर प्राथमिक औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आली होती. उंब्रज येथे वार्ड १ मधील महात्मा गांधी विद्यालय येथे दुपार नंतर धिम्या गतीने मतदान सुरू असल्याने काही मतदारांनी नाराजी व्यक्त केली. 


     या परिसरातील तळबीड, इंदोली, साबळवाडी
तासवडे, नागठाणे ,वडगाव उंब्रज, शामगाव,चोरजवाडी, तारगाव , हरपळवाडी, मरळी, पाल, माजगाव, गावांमध्ये  काही ठिकाणी मतदान सुरू होण्यापूर्वी व काही ठिकाणी मतदान सुरू झाल्यानंतर तांत्रिक दोष आल्यामुळे मतदान यंत्रे बदलावी लागली. काही वेळातच मतदान यंत्रे बदलुन तेथील मतदान पुर्ववत सुरळीत सुरु करण्यात आल्याचे तहसीलदार विजय पवार यांनी सांगितले. 

 

कराड उत्तरेत चुरशीने मतदान

कराड उत्तरच्या ग्रामीण भागात चुरशीने मतदान झाले असून दुपारी १ ते ३ दरम्यान उन्हाच्या तडाख्यात सुद्धा नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य बजावले असल्याने साठ टक्क्यांच्यावर मतदान गेले आहे.तुतारीचे मतदान बूथ जागोजागी मतदारांना मार्गदर्शन करीत होते तर भाजपचे कार्यकर्ते उंब्रज, पाल,मसूर अशा निमशहरी भागात सक्रिय होते.


   उत्तरेतील उंब्रज विभागात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. दुपारी १ वाजेपर्यंत ३१.९७ टक्के  मतदान कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात झाले त्यामुळे मतदानाचा टक्का गत पंचवार्षिक निवडणूकी पेक्षा घसरण्याची भीती होती परंतु दुपारनंतर मतदारांचा काहीसा प्रतिसाद वाढला. दुपारी तीन वाजेपर्यंतचे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ मतदान 43.55 मतदान झाले. त्यानंतर मतदारांची गर्दी वाढली. चार नंतर महिला मतदार बहुसंख्येने घराबाहेर पडल्याचे दिसून आले. सायंकाळी पाच वाजेपर्यंतचे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ मतदान ६५.३३ टक्के मतदान झाले. 


   कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याच चुरशीचा प्रचार झाला. मतदान केंद्रापासून काही अंतरावर दोन्ही उमेदवारांचे समर्थक मतदान प्रक्रिया पुर्ण होई पर्यंत तळ ठोकून होते.