वडिलांच्या हाकेने नीलमच्या पापण्यांची हालचाल

Tue 4th Mar 2025 07:17 pm
कोमात असलेली मुलगी पाहून वडील तानाजी शिंदे भावुक

अनिल कदम / उंब्रज 

 अमेरिकेत भीषण अपघात होऊन कोमात गेलेल्या लेकीला भेटण्यासाठी गेलेल्या वडिलांनी मध्यरात्री हॉस्पिटल गाठलं. नीलम मी आलोय अशी हाक त्यांनी मारली. वडिलांचे शब्द कानावर पडताच नीलमने पापण्यांची हालचाल केली. प्रतिसाद पाहून तानाजी शिंदे यांना रडू कोसळलं. बाप लेकीच्या नात्यातील जिव्हाळा पाहून हॉस्पिटल स्टाफ देखील गहिवरला. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेलेल्या कराड तालुक्यातील वडगाव ( उंब्रज) गावच्या नीलम तानाजी शिंदे या तरूणीचा काही दिवसांपुर्वी भीषण झाल्याने ती कोमात गेली आहे. 


दहाबारा दिवसाच्या प्रयत्नानंतर इमर्जन्सी व्हिसा मिळताच तानाजी शिंदे यांनी लेकीला भेटण्यासाठी अमेरिका गाठली. सोमवारी (३ मार्च) स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री दीड वाजता तानाजी शिंदे हे सॅक्रामेंटोमध्ये दाखल होताच त्यांनी थेट हॉस्पिटल गाठलं. नीलम मी आलोय, हे वडिलांचे शब्द कानावर पडताच लेकीच्या डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल झाली आणि बाप माणसाला रडू कोसळलं. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅक्रामेंटो शहरात १८ दिवसांपूर्वी कार अपघात नीलम शिंदे ही तरूणी गंभीररित्या जखमी झाली आहे. तिच्यावर युसी डेव्हिस मेडिकल सेंटरमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 


सोमवारी मध्यरात्री कॅलिफोर्नियात पोहोचताच महाराष्ट्र मित्र मंडळाच्या दोन सदस्यांनी नीलमचे वडील तानाजी शिंदे यांना विमानतळावरुन सोबत दिली. त्यांच्या निवासाची व जेवणाची सोय करण्यात आली आहे त्याठिकाणी जावून आपण विश्रांती घेवून सकाळी हाॅस्पिलला जावू असे विनंती या सदस्यांनी केली. परंतु वडील तानाजी शिंदे यांच्या डोळ्यात पाणी आले मला आत्ताच मुलीला भेटायचे आहे असा आग्रह त्यानी धरल्यानेथेट सॅक्रामेंटोतील हॉस्पिटल गाठण्यात आले. वास्तविक वैद्यकीय सुत्रांनी त्यांना सकाळी यायला सांगितलं. मात्र, आत्ताच मुलीला भेटण्याचा त्यांनी हट्ट त्यांनी केल्याने वडिलांच्या हट्टापुढं हॉस्पिटल प्रशासनाचं काही चाललं नाही. स्टाफनं त्यांना अतिदक्षता विभागात नेऊन मुलीला भेटवलं. दरम्यान हाॅस्पिलच्या अतीदक्षता विभागात पोहचताच नीलम मी आलोय असा आवाज वडीलांनी दिला. 


 वडिलांचे शब्द कानावर पडताच नीलमच्या डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल झाली. हा प्रतिसाद पाहून तानाजी शिंदे यांना रडू कोसळलं. हॉस्पिटल स्टाफ देखील यावेळी गहिवरुन गेला. बाप लेकीच्या नात्यातील जिव्हाळाही यावेळी सर्वांना पाहीला मिळाला. अमेरिकेत पोहचताच वडिलांनी आपल्या मुलीला डोळे भरून पाहिलं. मुलीने देखील प्रतिसाद दिल्यानं वडिलांना मोठा धीर आला. दरम्यान मागील १८ दिवसापासून नीलम कोमात आहे. तिचे दोन्ही पाय व एका हाताची अजिबात हालचाल होत नाही. तब्येत ढासळली असुन वजन मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. डोक्याला इजा झाल्याने केस काढण्यात आले असून १६ दिवसांपासून तिच्या पोटात अन्न गेलेले नाही. पुढील उपचाराच्या अनुषंगाने मंगळवारी सकाळी हाॅस्पिटल, मुलीचे वडील व तेथील सहकारी सदस्य यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे नीलमचे वडगाव (उंब्रज) येथील मामा संजय कदम यांनी सांगितले. 

 दरम्यान नीलमचे वडील तानाजी शिंदे व मामे भाऊ गौरव कदम हे इर्मजन्सी व्हिसावर अमेरिकेला गेले आहेत. दहा वर्षे व्हिसाची मुदत असते. परंतु, सहा महिन्याच्या आत त्यांना परत यावे लागते. नंतर पुन्हा ते अमेरिकेला जाऊ शकतात. या नियमानुसार नीलमचे वडील आणि मामे भाव यांना सलग सहा महिने अमेरिकेत राहता येईल. सुरूवातीचे दहा दिवस त्यांच्या राहण्याची सोय हॉस्पिटल प्रशासनाकडून करण्यात आली आहे. त्यानंतरची सोय अमेरिकास्थित महाराष्ट्रीयन लोकांच्या संस्थांकडून केली जाणार आहे. काही उद्योगपती देखील सहकार्यासाठी पुढं आले असल्याचे कदम कुटुंबियांकडून सांगण्यात आले.