भाजपचा जयघोष; राष्ट्रवादी-शिवसेनेचा निषेध, सभापती निवडीत रंगला राजकीय थरार

Sat 4th Apr 2026 10:09 pm

भाजपचा जयघोष; राष्ट्रवादी-शिवसेनेचा निषेध, सभापती निवडीत रंगला राजकीय थरार

सातारा | प्रतिनिधी

सातारा जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीच्या दिवशी आज जिल्हा परिषद परिसरात सकाळपासूनच कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळाला. प्रवेशासाठी बहुस्तरीय तपासणी, ओळखपत्रांची पडताळणी आणि मेटल डिटेक्टरद्वारे सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. चौथ्या मजल्यावर तर मोबाईल जमा करूनच सभागृहात प्रवेश देण्यात येत होता—यावरून निवड प्रक्रियेची संवेदनशीलता स्पष्ट होत होती.

दरम्यान, सभापती निवडीच्या प्रक्रियेत भाजपने बाजी मारत आपला दबदबा सिद्ध केला; मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने वेळेत अर्ज न भरता निषेधाचा मार्ग स्वीकारल्याने राजकीय वर्तुळात “जिंकले कोण, हरले कोण?” असा सवाल उपस्थित झाला आहे.

निवड प्रक्रियेनुसार सकाळी 10 ते 12 या वेळेत अर्ज भरण्याची मुदत होती. भाजप आणि त्यांच्या सोबत असलेल्या काही राष्ट्रवादी सदस्यांनी वेळेत अर्ज दाखल केले. मात्र, राष्ट्रवादी व शिवसेनेचे सदस्य काळ्या फिती बांधून घोषणाबाजी करत सभागृहात दाखल झाले, पण अर्ज भरण्याची मुदत संपत आल्याने त्यांनी औपचारिक सहभाग नोंदवला नाही. त्यानंतर त्यांनी निषेध नोंदवत सभागृहातून बाहेर पडणे पसंत केले.

या संपूर्ण प्रक्रियेत मंत्री जयाभाऊंची रणनीती विशेष चर्चेत राहिली. “प्लॅन ए, बी, सी” ची आखणी त्यांनी केल्याचा उल्लेख स्वतः त्यांनीच केला होता. त्याची झलक सभापती निवडीत स्पष्टपणे दिसून आली. ऋतुजा विराज शिंदे यांचे नाव अचानक पुढे येणे, खंडाळ्यात ऋषिकेश धायगुडे पाटील यांना संधी मिळणे, तसेच पुसेसावळीच्या तेजस्विनी कदम आणि लता कर्णे यांची निवड—या सर्व घडामोडींमुळे “सब कुछ जयाभाऊंचे” असे चित्र निर्माण झाले.

निवडीदरम्यानच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तातडीची पत्रकार परिषद आयोजित करत राजकीय वातावरण अधिक तापवले. त्यांनी स्पष्ट शब्दांत भाजपला इशारा देत, “हे इथेच थांबणार नाही, अजून पाच वर्षे आहेत. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो,” असे ठाम विधान केले.

त्याच वेळी मंत्री मकरंद पाटील यांनीही आक्रमक भूमिका घेत, “आम्ही काल राजकारणात आलो नाही. 60 वर्षांची परंपरा आहे. जबरदस्तीने कोणी पक्षात आले नव्हते, याचे उत्तर दिले जाईल,” असा इशारा दिला.

विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या पायऱ्यांवर बसून सदस्यांनी आंदोलन केल्याची घटना देखील यावेळी घडली, जी स्थानिक राजकारणाच्या इतिहासातील दुर्मीळ घटना मानली जात आहे.

या निवडीत लता कर्णे कृषी सभापती म्हणून आणि तेजस्विनी कदम शिक्षण सभापती म्हणून पहिल्यांदाच निवडून आल्याने ऐतिहासिक नोंद झाली आहे.

दरम्यान, राजकीय बैठकींचेही वेगळे चित्र दिसून आले. भाजपची बैठक हॉटेल फरन येथे, तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक हॉटेल प्रीती येथे पार पडली.

एकंदरीत, सभापती निवड प्रक्रियेत भाजपने संघटनशक्ती आणि नियोजनाचा जोर दाखवत विजय मिळवला; तर विरोधकांनी निषेधाचा मार्ग स्वीकारत आगामी राजकीय संघर्षाची चाहूल दिली आहे.