खोडजाईवाडीत विविध विकास कामांचं भूमिपूजन व उद्घाटन
मसूर / प्रतिनीधी
सर्वांगीण विकासाचा ध्यास ठेवून गट-तट न पाहता यशवंतराव चव्हाणांचा विचार जोपासण्याचा प्रयत्न केला. दीडशे कोटींचा विकास केला म्हणणाऱ्यांनी फक्त नारळ फोडण्याचं काम केलं. त्यातील कोणतीच कामे पूर्ण केली नाहीत, मला जनतेने संधी दिल्यानंतर त्यांच्या यादीतील कामे मीच पूर्ण केली. विकास काय असतो, हे दाखवून दिले. आता ही निवडणुकीच्या तोंडावर काही लोक येतील... आमिष दाखवतील.... भूलथापा देतील... मात्र कराड उत्तरची जनता त्यांना बळी पडणार नाही असा विश्वास आमदार बाळासाहेब पाटील यांनी खोडजाईवाडी (ता. कराड) येथील विविध विकास कामांच्या उद्घाटन व भूमिपूजन प्रसंगी बोलताना व्यक्त केला.
कराड उत्तरच्या जनतेने मला विधानसभा सदस्य म्हणून दिलेली संधी मी जबाबदारीपूर्वक पार पाडताना प्रत्येक गाव, वाडी- वस्तीवर सामान न्यायाने निधीचे वाटप करून कोट्यावधी रुपयांची विकासकामे केली. माणसांची मने व रस्त्यांचे जाळे विणत गेलो. शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या योजना, उंच पूल, पक्के रस्ते, पक्के गटर्स, सामाजिक सभागृह, शाळा खोल्या, व्यायाम शाळा, तालीमगृह, साखळी सिमेंट बंधारे, साठवण बंधारे, पाझर तलाव आदी विकासकामे केली. विकासाची घोडदौड अशीच चालू राहण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मला पुन्हा आपली सेवा करण्याची संधी द्या.
आमदार बाळासाहेब पाटील
यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समितीचे माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. विजय साळुंखे, माजी सनदी अधिकारी तानाजीराव साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सौ.संगीता साळुंखे प्रमुख उपस्थित होते.
आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले राज्यात 2019 पूर्वी सत्तेत असलेल्या युती शासनाच्या प्रचारार्थ मतदानाचा जोगवा मागण्याकरिता तत्कालीन मंत्र्यांनी व त्यांच्या साथीदारांनी हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचे पाणी तुम्हाला दिल्याशिवाय मते मागायला येणार नाही अशी वल्गना केली होती. ही योजना घाईघाईत कार्यान्वित करण्याच्या उद्देशाने मूळ डिझाईनमधून किवळ, खोडजाईवाडी, अंतवडी आदी गावातील शेकडो एकर क्षेत्र कमी केले, सदर क्षेत्र या योजनेपासून वंचित ठेवण्याचे पाप युती सरकारनं केले
यावेळी मानसिंगराव जगदाळे, डॉ विजय साळुंखे, तानाजीराव साळुंखे, सौ.संगीता साळुंखे यांनी आपल्या भाषणामध्ये आमदार बाळासाहेब पाटील यांनी केलेले विकास काम, कर्तव्यनिष्ठा यावर विश्वास ठेवून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. खोडजाईवाडीच्या साठवण तलावासाठी शासनाने अधिगृहीत केलेल्या जमीनीचा कोट्यावधी रुपयाचा मोबदला बाधित शेतकऱ्यांना आमदार बाळासाहेब पाटील यांनी मिळवून दिला. त्याबद्दल त्यांचे ग्रामस्थांच्यावतीने संभाजी मांडवे, सुरेश साळुंखे, उद्धव मांडवे, प्रकाश मांडवे यांनी धन्यवाद दिले. सागर गोडसे यांनी प्रास्ताविक केले. दत्तात्रय पवार - नाशिककर यांनी आभार मानले.कार्यक्रमास प्रदीप काशीद, रामभाऊ जगदाळे, कृष्णत साळुंखे, सुनील साळुंखे, दिलीप साळुंखे, विष्णू पवार, कैलास साळुंखे, राजेंद्र दाजीराम मांडवे, बबन जाधव, संभाजीराव मांडवे, महेंद्र मांडवे, उद्धव मांडवे, सुभाष गोडसे, बजरंग कोकाटे, नाथाजी साळुंखे, सागर गोडसे, ज्ञानदेव साळुंखे, पोपट मांडवे, बबन गोडसे, यशवंत मांडवे, रत्नकांत साळुंखे, शंकर मांडवे, सौ विमल पवार, सौ कुसुम जाधव, सौ शारदा साळुंखे, सौ रेखा मांडवे, श्रीमती शालन मांडवे, सौ कौशल्य कोकाटे यांच्यासह खोडाजाईवाडी, किवळ येथील पुणे, मुंबई, नाशिक शहरांमध्ये नोकरी व्यवसायानिमित्त कार्यरत असलेले ग्रामस्थ उपस्थित होते.