सराफ व्यावसायिकांसह उंब्रजकरांच्या सुरक्षेला प्राधान्य

Wed 25th Feb 2026 04:42 pm
लुटीच्या पार्श्वभूमीवर उंब्रज पोलिसांची तातडीची बैठक; प्रतिबंधात्मक उपायांवर भर

उंब्रज / प्रतिनिधी

उंब्रज येथे अलीकडेच घडलेल्या दागिने लुटीच्या धाडसी घटनेनंतर उंब्रज पोलिसांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी तातडीने पावले उचलली असून सराफ व्यावसायिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी उपस्थित सराफ व्यावसायिकांशी संवाद साधत सुरक्षाविषयक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

दि. २५ फेब्रुवारी रोजी उंब्रज पोलीस ठाण्यात पार पडलेल्या या बैठकीत अलीकडील चोरीची घटना ही पूर्वनियोजित पद्धतीने पाळत ठेवून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न होत असल्याची माहिती पवार यांनी दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर तसेच पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू असून तांत्रिक माहिती व स्थानिक सूत्रांच्या आधारे आरोपींचा शोध वेगाने घेतला जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी पोलिसांबरोबरच व्यावसायिकांनी स्वतःच्या सुरक्षेबाबत सजग राहणे अत्यावश्यक असल्यावरही त्यांनी भर दिला. दुकानांमध्ये नाईट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, प्रवेश व निर्गमन बिंदूंवर स्वतंत्र कॅमेऱ्यांची व्यवस्था करणे, सामाईक वॉचमन नेमणे, मौल्यवान दागिन्यांची सुरक्षित ने-आण करणे, व्यवहारातील गोपनीयता राखणे तसेच आपत्कालीन सायरन प्रणाली कार्यान्वित ठेवणे यांसारख्या उपाययोजना तातडीने राबविण्याचे आवाहन करण्यात आले.

उंब्रज परिसर अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने व्यापारी संघटना, युवक-युवती तसेच शाळा व महाविद्यालय प्रशासनाशी समन्वय साधून नियमित जनजागृती बैठका आयोजित करण्यात येणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे उंब्रजमध्ये सुरक्षाविषयक सजगता वाढण्यास मदत होणार असून पोलिस-नागरिक सहकार्याच्या बळावर गुन्हेगारी प्रवृत्तींवर प्रभावी नियंत्रण मिळविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.